कामगार एकीचे बळ
कामगार एकीचे बळ या वर नांदेड जिल्हा इमारत व
इतर बांधकाम कामगार कल्याणकारी संघ नांदेड चे अध्यक्ष उद्धवराव संभाजी चव्हाण
साहेबांनी काही कविता व एक गोष्ट सांगुन समजवण्याचा प्रयत्न केला.
कवितेचे नाव एकीचे बळ
एक विचार असेल तर
एकी जुळून राहते.
एक विचार नसेल तर
एकीच टळून जाते
जरी घमेंड दाखवण्या
अग्रेसर स्वबळ असते
तरीही एकीचे बळ हे
नेहमीच प्रबळ असते
कवितेचे नाव आपण सारे कामगार भाऊ
आपण सारे कामगार भाऊ कामगार भाऊ एक मुखाने राहू
प्रेमाने गावे एकतेचे गीत हे गाऊ..
एकीचे हे बळ मोठाले एकटे कुणी राहू नका मागे
सत्तेसाठी आप्तजनांना दूर मुळी लोटू नका
इथले सारे इथेच राहील माझे माझे करू नका
मी पणाच्या गर्वाने कामगार भाऊ नो कधी फुगू नका
कामगार एकीच्या त्या गोळ्या खाऊन ठणठणीत राहू..
कामगार भाऊ प्रेमाने गाऊ एकीचे नारे एकच पर्व
कामगार सर्व
कामगार एकीवर एक बोधकथा
पावसाळ्याचे दिवस होते आणि त्या दिवशी मुसळधार
पाऊस पडत होता. सर्वत्र प्रचंड पाणी साचले होते. म्हणून पिसईच्या सातही वाडय़ांमधी
मुलांना लवकर सोडण्यात आले. शाळा लवकर सुटणार म्हणून मुले जाम खूश झाली आणि
त्याहीपेक्षा पावसात भिजायला मिळणार याचा त्यांना खूप आनंद झाला होता. “तुम्हा
मुलांचा पाऊस आवडता ऋतू आहे की नाही रे?” पण, निघताना
प्रत्येक वर्गातील मुलांना आपापल्या वर्ग शिक्षकांनी ताकीद दिली होती, जिथे
जास्त पाणी भरले असेल तर पाण्यात उतरू नका रे आणि जर उतरलात तर सांभाळून एकमेकांचे
हात पकडून जा बरं का!
पिसईच्या सरस्वती विद्या मंदिरात सर्वात जास्त
मुलं काटकरवाडीतील होती. अत्यंत हुशार पण तितकीच टवाळखोरही! ती सर्व मुलं शाळा
सुटल्यावर दाटीवाटीने आपल्या नेहमीच्या वाटेने घराकडे निघाली होती. घराकडे जाताना
त्यांना निगडीजवळील एक घोटासा ओहळ पार करून जावे लागत असे. पण आज ते ओहळ फारच
दुथडी भरून वाहत होते. पाण्याचा वेगही खूप होता. सारी मुलं ओहळाच्या काठावर येऊन
थांबली होती. पाण्यात पाय टाकला तर नक्कीच वाहून जाणार हे त्यांना ठाऊक होते
म्हणून कुणीच पाण्यात उतरायला तयार नव्हते. सर्वजण पाऊस कमी होऊन पाणी ओसरण्याची
वाट बघत होते. काटकर वाडीत जाण्यासाठी त्या मुलांना फक्त एक हीच वाट होती, त्यामुळे
दुसरीकडून जाऊही शकत नव्हते.
खूप वेळ झाला पण पाऊस काही कमी होईना. एवढय़ात
त्या मुलांमधील दोन अवलियांना एक युक्ती सुचली. जडये बाईंनी सांगितलेल्या “एकीचे
बळ” या गोष्टीची त्यांना आठवण झाली. राजन आणि राजकुमार हे सख्खे भाऊ
जेवढे अभ्यासात हुशार होते तेवढेच सामान्यज्ञानात ही तरबेज होते. त्यांनी पटापट
सर्व मुलांना एकत्र बोलावले व एक मुलगा एक मुलगी असे करत एकमेकांचे हात धरून भली
मोठी साखळी तयार केली. साखळी तयार होताच राजकुमार आणि राजन दोघा भावांनी एकमेकांचे
हात पकडून पाण्याच्या प्रवाहात निडरपणे पाय टाकले. पाण्याचा प्रवाह जोराने वाहत
होता पण, या दोघांनी आपली सर्व शक्ती एकवटून ते ओहळाच्या मध्यात जाऊन उभे
राहिले.
मधोमध उभे राहताच राजकुमारने आपला डावा हात
काठाकडे लांब केला आणि बाकीच्या मुलांना साखळीसहीत हळूहळू पाण्यात उतरण्यास
सांगितले. मुलं घाबरत घाबरत हलकेच पाण्याच्या प्रवाहात उतरली. सर्व मुलांनी एक
होऊन साखळी केल्याने व राजकुमार, राजनच्या युक्तीमुळे सारी मुलं “एकीच्या
बळाने” निगडीजवळचा ओहळ पार करून सुखरूप घरी पोहोचले. सर्वानी आपापल्या घरी
मोठय़ा हिमतीने ओहळ पार केल्याची गोष्ट घरातील सर्वाना सांगितली. प्रत्येकाच्या
आई-बाबांनी सर्वाचे फार कौतुक केले आणि एक कानमंत्र दिला. एकीचे बळ हीच खरी
विकासाची किल्ली आणि शक्ती आहे ती कधी तोडू नका. हीच वेळ आहे सर्व कामगारांनी
एकत्र येण्याची व एकच नारा एकच पर्व कामगार सर्व